• जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

बेळगाव : निवडणूक आयोगाने जारी केलेले नियम व मार्गदर्शक तत्त्वानुसार मतदारयाद्यांची विशेष सखोल पुनर्तपासणी (एसआयआर) प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडावी. कोणताही पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहता कामा नये.मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत लोकशाही हक्क आहे. हा हक्क प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. निवडणूक नोंदणी अधिकारी व साहायक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

सुवर्णसौध येथील सेंट्रल हॉलमध्ये एसआयआरबाबत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेला बेळगाव विभागातील अप्पर जिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, साहायक मतदार नोंदणी अधिकारी, तहसीलदार, तांत्रिक साहाय्यक उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्या अचूक, पारदर्शक व त्रुटीरहित ठेवण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण आहे. जिल्हाधिकारी म्हणाले, बेळगाव उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदणी असलेल्या मतदारांच्या नोंदणीचे कार्य यापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे.

मात्र अनेक नागरिक अद्याप या प्रक्रियेत सहभागी झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उर्वरित नोंदणीचे काम तातडीने पूर्ण करून योग्य क्षेत्रीय सर्वेक्षणाद्वारे पात्र नागरिकांचा मतदारयादीत समावेश करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले. सह मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. राघवेंद्र यांनी एसआयआर प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देताना, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारयाद्यांची पुनर्तपासणी पूर्णपणे पारदर्शक व त्रुटीरहित पद्धतीने व्हावी, यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. निवडणूक नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे काही अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची उदाहरणे आहेत.

यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी अत्यंत जबाबदारीने निवडणूक कामकाज पार पाडावे. तसेच पात्र मतदारांचा समावेश व अपात्र मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्यात यावे. अनुपस्थित व स्थलांतरित मतदारांची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. कार्यशाळेदरम्यान नवीन मतदार नोंदणी, नाव दुऊस्ती, पत्ता बदल, मृत व दुबार मतदारांची नावे वगळणे तसेच ऑनलाईन सेवांचा वापर यासह मतदारयादी सुधारणेच्या विविध बाबींवर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या शंका आणि अडचणी मांडून त्यांचे निरसन करून घेतले. या कार्यशाळेला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह बेळगाव विभागातील अधिकारी उपस्थित होते.