- गोटूरनजीक कारची ट्रकला धडक, तिघे गंभीर जखमी
बेळगाव : पुणे – बेंगळूर गोटूर नजीक राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारने मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पहाटे पाचच्या सुमारास घडला.
या अपघातात हनुमंत पायाळ यांचा जागीच मृत्यू झाला. ते मूळचे सापनाई (ता. कळंब) येथील असून सध्या कात्रज-सातारा रोड, पुणे येथे वास्तव्यास होते. जखमींमध्ये महानंदा हनुमंत पायाळ (वय ४५), अनिल दाजीराम अंगारके (वय ५०), अजय अनिल अंगारके (वय २८) आणि सुनीता अनिल अंगारके (वय ४५) यांचा समावेश असून सर्वजण पुणे येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर बेळगावातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबीय हुबळी येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्याहून कारने निघाले होते. संकेश्वरमार्गे हुबळीच्या दिशेने जात असताना गोटूर हद्दीत त्यांच्या कारने समोरील मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ट्रक संकेश्वरहून धारवाडकडे जात होता.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. पुढील तपास सुरू आहे.








