- अचानक तपासणी करून नोंदींची पडताळणी
- अनियमितता आढळल्यास कारवाईचा इशारा
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मुतगा ग्रामपंचायतीच्या कामकाजाची उपलोकायुक्त बी. वीरप्पा यांनी शनिवारी अचानक तपासणी केली. यावेळी ग्रामपंचायतीतील विविध नोंदींची पडताळणी करून त्यांनी प्रशासनातील त्रुटींवर लक्ष वेधले. नियमबाह्य कामांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.
ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती नोंदवहीच्या व्यवस्थापनात त्रुटी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या बाबीकडे दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत लेआउट विकसित होत असल्यास त्याला परवानगी देणाऱ्या पीडीओंसह संबंधित लेआउट मालकांवरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी बजावले.
ग्रामपंचायतीच्या अखत्यारितील विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांकडे जीएसटी नोंदणी असणे आणि प्रत्येक कामाची अधिकृत पावती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक व्यवहारांमध्ये नियमांचे उल्लंघन किंवा गैरप्रकार आढळल्यास लोकायुक्त कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर उपलोकायुक्तांनी मुतगा येथील अंगणवाडी केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. स्वयंपाकासाठी गॅस वापरताना सुरक्षिततेची खबरदारी घेण्यासह मुलांच्या आवाक्याबाहेर धोकादायक वस्तू ठेवण्याच्या सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. गर्भवती महिलांना अंडी, बालकांना पौष्टिक आहार तसेच मुलांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य नियमितपणे मिळते की नाही, याचीही त्यांनी माहिती घेतली.
अंगणवाडीतील भोजन व्यवस्था किंवा गर्भवती महिला व बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबत हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा उपलोकायुक्त बी. वीरप्पा यांनी दिला.
या पाहणीवेळी लोकायुक्त उपनिबंधक अरविंद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव के. एन. शिवकुमार, बेळगाव लोकायुक्त अधीक्षक प्रसन्न देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.








