बेळगाव : मुचंडी (ता. जि. बेळगाव) येथे श्री महालक्ष्मी देवी व श्री मरगाई देवी यात्रेनिमित्त येत्या सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी दुपारी ठीक ३ वाजता भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोकाक रोड, मुचंडी येथील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या पायथ्याशी हे कुस्ती मैदान होणार आहे. या मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील आणि वर्ल्ड चॅम्पियन पै. इरफान इराण यांच्यात खेळविली जाणार आहे. त्याचप्रमाणे २ ते ५ क्रमांकापर्यंतच्या कुस्त्या अनुक्रमे भोसले व्यायाम शाळा सांगलीचा पै. प्रशांत शिंदे विरुद्ध हरियाणा केसरी पै. वीरेंद्र कुमार, लहान कंग्राळीचा कर्नाटक केसरी पै. कामेश पाटील विरुद्ध भोसले व्यायाम शाळा सांगलीचा महाराष्ट्र चॅम्पियन पै. बाळू अपराध, मुधोळचा कर्नाटक केसरी पै. सदाशिव नलवडे विरुद्ध तालीम गंगावेस कोल्हापूरचा महाराष्ट्र चॅम्पियन पै. विश्वचरण सोलनकर आणि लहान कंग्राळीचा डबल कर्नाटक चॅम्पियन पै. प्रेम जाधव विरुद्ध कोल्हापूरचा पै. दादू चौगुले यांचा नातू पै. अक्षय चौगुले अशा होणार आहेत.
वरील कुस्त्यांव्यतिरिक्त सदर कुस्ती मैदानात लहान – मोठ्या ५० हून अधिक चटकदार कुस्त्या लावल्या जाणार आहेत. मेंढ्याच्या बक्षीसासाठी ४ कुस्त्या होणार असून त्यामध्ये पै. बलराज चौगुले विरुद्ध पै. विक्रम हुबळी, पै. प्रल्हाद हुलीकोतली विरुद्ध पै. तुषार शिंदे, पै. श्रेयस खाडली विरुद्ध पै. विनायक गौंडवाड आणि पै. स्वराज पाखरे विरुद्ध पै. तन्मय मो. कंग्राळी या कुस्त्यांचा समावेश आहे. कुस्ती आखाडा व तालमीच्या वस्तादांसह हौशी पैलवानांनी सदर कुस्ती मैदानासंदर्भात अधिक माहितीसाठी पै. अतुल सुरेश शिरोले (मो. क्र. ८८६११६९२१७) अथवा पै. परशुराम पुंडलिक मोदगेकर (मो. क्र. ९७३९१८४९३३) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच कुस्ती शौकिनांनी बहुसंख्येने या कुस्ती मैदानाला हजेरी लावून कुस्त्यांचा आनंद लुटण्याबरोबरच मैदान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








