• राज्यभर संयुक्त जनजागृतीची घोषणा

मुंबई (मीरारोड) : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या मीरारोड येथील मध्यवर्ती कार्यालयात राज्याध्यक्ष श्री. गोवर्धन देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मराठी भाषा, मराठी अस्मिता, सीमाभागातील मराठी बांधवांचे न्याय्य हक्क तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्य ही गेल्या १० ते १२ वर्षांपासून महाराष्ट्रात मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी अस्मितेचा आवाज बुलंद करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. दुसरीकडे, बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा, यासाठी सीमाभागातील मराठी बांधवांचा गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू आहे. या दोन्ही चळवळींची उद्दिष्टे समान असल्याने भविष्यात अधिक समन्वयाने आणि व्यापक स्वरूपात कार्य करण्याबाबत एकमत झाले.

बैठकीदरम्यान सीमाभागातील मराठी अस्मितेच्या प्रश्नाला संपूर्ण महाराष्ट्राचे बळ मिळावे, यासाठी राज्यभर व्यापक जनजागृती, संघटनबांधणी आणि लोकसहभागाच्या माध्यमातून नव्या लोकचळवळीची उभारणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता आणि सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी संयुक्तपणे संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष मा. शुभम शेळके, कार्याध्यक्ष मा. धनंजय पाटील व सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष श्री. गोवर्धन देशमुख तसेच समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मनःपूर्वक स्वागत केले.

बैठकीत महाराष्ट्रातील विविध सामाजिक प्रश्न, मराठी समाजाचे संघटन, आगामी जनजागृती अभियान आणि विशेषतः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली. सीमाभागाचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी दोन्ही संघटनांनी संयुक्तपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर मराठी एकीकरणासाठी व्यापक लोकजागृती अभियान राबविण्यात येणार असून, मराठी समाजाला संघटित करून मराठीच्या सन्मानासाठी आणि सीमाभागाच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

“मराठीचा सन्मान, सीमाभागाचा न्याय आणि अखंड महाराष्ट्राचा स्वाभिमान” हा सामायिक ध्यास घेऊन दोन्ही संघटना आगामी काळात एकत्रितपणे कार्य करतील, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.