- मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
- जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर
बेळगाव : शहरातील मराठी आणि इंग्रजी नामफलकांवर झालेल्या कारवाईचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणचे मराठी नामफलक झाकण्यात आणि हटविण्यात आल्याच्या घटनांविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रशासनाकडे दाद मागितली आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि मराठी फलकांबाबत दबाव निर्माण करणाऱ्यांना आळा घालावा, अशी मागणी समितीने केली आहे.
या मागणीसाठी शुक्रवारी समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यानंतर पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्याशीही चर्चा करून नामफलकांबाबतच्या घटनांकडे लक्ष वेधण्यात आले.
समितीने दिलेल्या निवेदनात १ नोव्हेंबरपूर्वी शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मराठी आणि इंग्रजी भाषेतील अनेक फलकांवर कारवाई झाल्याचा उल्लेख केला आहे. संबंधितांना कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा कायदेशीर प्रक्रिया न पाळता हे फलक झाकण्यात अथवा हटविण्यात आल्याचे समितीचे म्हणणे आहे. खासगी जागेवर लावलेल्या व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांच्या नामफलकांबाबत पोलिसांनी हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका समितीने मांडली.
या संदर्भात यापूर्वी २२ जून २०२६ रोजीही प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या कार्यालयाबाहेरील नामफलक हटविण्यासंदर्भात खडेबाजार पोलिसांनी त्यांना सूचना केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. खासगी मालमत्तेवरील फलक हटविण्याबाबत पोलिसांच्या अधिकारांवर समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान, काही कन्नड संघटनांचे कार्यकर्ते व्यापाऱ्यांना मराठी पाट्या काढून कन्नड नामफलक लावण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप समितीने केला. अशा घटनांमुळे भाषिक सलोख्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून संबंधित प्रकारांना प्रतिबंध घालावा, अशी मागणी करण्यात आली.
समितीने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाला आठ दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत संबंधितांवर कारवाई न झाल्यास पुढील १५ दिवसांत व्यापक आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण-पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, अॅड. अमर येळ्ळूरकर, आर. एम. चौगुले, नेताजी जाधव यांच्यासह समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.








