- खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या बैठकीत निर्धार
खानापूर : मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी युवकांनी संघटित होऊन पुढाकार घ्यावा, असा निर्धार खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
रविवार दि. २४ मे रोजी श्री शिवस्मारक येथे आयोजित या बैठकीत युवा कार्यकर्त्यांनी समितीच्या ध्येय-धोरणाशी बांधील राहून मराठी अस्मितेसाठी कार्य करण्याचा निर्धार केला.
यावेळी रावसाहेब वागळे कॉलेजचे शिक्षक शंकर गावडा आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावचे चिटणीस प्रतीक पाटील यांनी युवकांना मार्गदर्शन केले. शंकर गावडा यांनी सीमाप्रश्नाचा इतिहास सांगताना मराठी भाषा, संस्कृती आणि शाळा टिकवण्याची जबाबदारी युवकांनी समर्थपणे पार पाडली पाहिजे, असे सांगितले.
प्रतीक पाटील यांनी सीमालढ्याचा इतिहास मांडताना मराठी शाळा या मराठी भाषेचा कणा असल्याचे स्पष्ट केले. शासनाकडून मराठी शाळा बंद पडाव्यात यासाठी अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी युवकांनी गावोगावी जागृती करावी, असे आवाहन केले. यावर्षापासून खानापूर तालुक्यातील मराठी शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाची जबाबदारी युवा कार्यकर्त्यांनी स्वीकारावी, असेही त्यांनी सांगितले.
युवा समितीचे पदाधिकारी साईनाथ शिरोडकर यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर, स्पर्धा परीक्षांचे महत्त्व आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य योजनांविषयी मार्गदर्शन केले.
बैठकीला सुनील पाटील, शुभम कांबळे, बाळकृष्ण पाटील, प्रसन्न पाटील, लक्ष्मण भातकांडे, वैभव कारेकर, संदेश कोडचवाडकर, प्रसाद देसाई, यतीन पाटील, मुकेश गुरव, आर्यन पाटील, लक्ष्मण शास्त्री, राम चिखलकर, यश गावडे, प्रथमेश मेलगे, चेतन हंगीरगेकर, विकास पाटील, सोमनाथ गोरे, पृथ्वीराज गुरव, राहुल चापगावकर, आदित्य देसाई, ओंकार पाटील, राघोबा, कपिल, दत्तराज, बापू, निखिल, हर्ष, सिमानी, परशुराम मुतगेकर आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.








