• एसआयआर प्रक्रियेत मराठी अर्जांच्या मागणीवर जिल्हा प्रशासनाचे उशिरा स्पष्टीकरण

बेळगाव : एसआयआर प्रक्रियेसाठी मराठीतील अर्ज उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर अखेर तब्बल २५ दिवसांनंतर जिल्हा प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर अर्ज भरण्यासाठी कन्नड अर्जाची मराठी भाषांतरित प्रत उपलब्ध करून दिली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, मराठीत मूळ अर्ज उपलब्ध करून देण्याच्या मागणीबाबत कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

भारतीय निवडणूक आयोगाने २००२ मध्ये भाषिक अल्पसंख्याक असलेल्या मतदारसंघांमध्ये संबंधित भाषेत निवडणुकीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केलेल्या तक्रारीची दखल घेत केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने कर्नाटक निवडणूक अधिकाऱ्यांना मराठीत अर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

वेळेत मराठीत मूळ अर्ज उपलब्ध झाले असते, तर बेळगावातील मराठी भाषिक मतदारांना अनावश्यक मनस्ताप सहन करावा लागला नसता. या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा प्रशासनाने दीर्घकाळ मौन बाळगल्याची टीकाही करण्यात आली आहे.

मराठीत मूळ अर्ज उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याचे सांगण्यात आले असून, एसआयआर प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात तरी मराठी अर्ज उपलब्ध करून द्यावेत. तसेच त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक प्रक्रियेसाठीचे अर्ज आणि सुधारित मतदार याद्याही मराठी भाषेत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.