• लष्कराच्या ताकदीत भर

बेळगाव : शहरातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये १६ व्या ‘भैरव बटालियन’ची दिमाखदार स्थापना करण्यात आली. भारतीय लष्कराच्या सामर्थ्यात मोलाची भर घालणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.

खडकाळ व डोंगराळ भागातील कारवाया, तसेच बंडखोरीविरोधी आणि दहशतवादविरोधी मोहिमांसाठी ही बटालियन विशेष तयार करण्यात आली आहे. अत्याधुनिक प्रशिक्षण घेतलेल्या जवानांमुळे ही तुकडी कोणत्याही आव्हानाला समर्थपणे सामोरी जाण्यास सज्ज असल्याचे दिसून आले.

स्थापना सोहळ्यात शिस्तबद्ध पथसंचलन, मानवंदना आणि लष्करी दिमाखाचा प्रत्यय उपस्थितांना आला. कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते बटालियनचा ध्वज सुपूर्द करण्यात आला.

या नव्या बटालियनच्या स्थापनेमुळे भारतीय लष्कराची ताकद, वेग आणि सज्जता अधिक बळकट झाली असून राष्ट्ररक्षणाच्या दृष्टीने एक नवा अध्याय सुरू झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.