बेळगाव : कपिलेश्वर मंदिर परिसरातील तलावाजवळ भिंत कोसळून दोन बालकांचा मृत्यू झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आणि सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत चर्चा केली.
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्घटनेत मृत्यू झाल्याने शहरभर हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर आयुक्त कार्तिक एम. , नगरसेवक राजू भातकांडे तसेच अभियंत्यांच्या पथकाने तलाव परिसराची पाहणी केली. यावेळी तलावाच्या भिंतींची स्थिती आणि संभाव्य धोका याबाबत तपासणी करण्यात आली.
पाहणीनंतर आयुक्तांनी सांगितले की, तलावाची जागा खासगी मालकीची असून अलीकडील पावसामुळे आणखी एका बाजूची भिंत धोकादायक स्थितीत आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल विभाग आणि अभियंत्यांनी संयुक्त सर्वेक्षण पूर्ण केले असून पुढील दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
नगरसेवक राजू भातकांडे यांनी सांगितले की, तलाव मालकांसोबत बैठक घेऊन सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. भविष्यात तलावाचे पुनरुज्जीवन आणि विकासकामे हाती घेऊन अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच परिसरात संरक्षक भिंत उभारण्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या दुर्घटनेमुळे शहरातील खासगी आणि सार्वजनिक जलस्रोतांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनपा प्रशासनाने धोकादायक ठिकाणांची पाहणी करण्याचे आदेश दिले असून पावसाळ्यापूर्वी जुन्या विहिरी आणि असुरक्षित वास्तूंचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सध्या तलाव परिसरात बॅरिकेड्स उभारून नागरिकांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे.







