• बेळगाव-पणजी महामार्गावरील घटना
  • जटगा गावावर शोककळा

खानापूर : बेळगाव–पणजी महामार्गावरील माणिकवाडी क्रॉसजवळील पुलाजवळ मंगळवारी रात्री भरधाव दहा चाकी ट्रकने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील युवराज शत्रुघ्न मळीक (वय २८) आणि त्यांच्या पत्नी मोहिनी मळीक (वय २४) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मळीक कुटुंबीयांसह जटगा गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक केए २२ एए ९६६६ ने खानापूरहून येणाऱ्या दुचाकीला माणिकवाडी क्रॉसजवळ जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. युवराज रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, तर मोहिनी या रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या.

अपघाताचा मोठा आवाज झाल्याने माणिकवाडी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिक जमा होताच ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.

युवराज मळीक हे लष्करी सेवेत कार्यरत होते. गणेश चतुर्थीनिमित्त ते दोन दिवसांपूर्वीच जटगा येथे सुटीवर आले होते. चतुर्थीनंतर जम्मू-काश्मीर येथे पुन्हा सेवेत रुजू होणार होते. मंगळवारी सायंकाळी काही कामानिमित्त पती-पत्नी खानापूरला गेले होते. तेथून परतताना माणिकवाडी क्रॉसजवळ काळाने त्यांच्यावर घाला घातला.

युवराज यांच्या पश्चात आई-वडील आणि बहिण असा परिवार आहे. पती-पत्नीचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिस ठाण्याचे पीएसआय एल. एच. गवंडी यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर शासकीय दवाखान्याच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यासह घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.