• मुलगी थोडक्यात बचावली

बेळगाव : शहरातील मंडोळी रोड परिसरात एका महिला वकिलाच्या घरावर अज्ञातांकडून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

ॲड. पूजा काकतकर यांच्या घरावर शनिवारी मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी घराच्या पहिल्या मजल्यावर लक्ष्य केले होते. त्यावेळी काकतकर यांची मुलगी संस्कृती ही पहिल्या मजल्यावर अभ्यास करत होती. सुदैवाने ती या घटनेतून थोडक्यात बचावली.

गोळी घराच्या काचेला लागून काचेवर फायरिंगचे स्पष्ट चिन्ह दिसून आले आहे. घटनेची माहिती मिळताच सुको (SUKO) पथक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. गोळी लागलेली काच पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ॲड. काकतकर गेल्या १८ वर्षांपासून वकिली करत असून त्यांनी अनेक उच्चप्रोफाईल प्रकरणांमध्ये बाजू मांडली आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे त्या प्रकरणांचा काही संबंध आहे का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी काकतकर कुटुंबाला संरक्षण देण्याची हमी दिली असून फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे.