- ११.७३ लाखांच्या २० दुचाकी जप्त
बेळगाव : येळ्ळूर परिसरातील दुचाकी चोरी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून २० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. फकीरप्पा सिद्धप्पा करीगार (वय २५, रा. हिरेहट्टी, ता. गोकाक जि. बेळगाव), रमेश प्रभू पाटील (वय २३, रा. आलदाळ, ता. हुक्केरी जि. बेळगाव) आणि कमलप्पा उर्फ कमलु यल्लाप्पा गुंड्यागोल (वय ३८, रा. केंचनट्टी, मार्कंडेयनगर ता. बेळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणाची माहिती अशी की, होनगा (ता. बेळगाव) येथील दिलीप तुकाराम जाधव यांनी त्यांची मोटरसायकल (क्र. केए २२ ईवाय ६६८८) येळ्ळूर येथून चोरीला गेल्याची तक्रार गेल्या २३ एप्रिल २०२६ रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
या चोरीचा छडा लावण्यासाठी बेळगाव शहर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त (कायदा -सुव्यवस्था) पोलीस उपायुक्त (गुन्हे -वाहतूक) आणि बेळगाव ग्रामीण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौड्र यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक स्थापण्यात आले होते. या पोलीस पथकाने मोटरसायकल चोरीचा तपास करत असताना संशयावरून उपरोक्त तिघा आरोपींना काल शनिवारी ताब्यात घेतले. . चौकशीत आरोपींनी येळ्ळूर, मार्कंडेयनगर, टिळकवाडी, शहापूर आणि हुक्केरी परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून यामाहा, हीरो स्प्लेंडर, टीव्हीएस, सुझुकी आदी कंपन्यांच्या एकूण २० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे ११.७३ लाख रुपये आहे.
याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे. मोटरसायकल चोरी प्रकरणाचा यशस्वी छडा लावल्याबद्दल शहर पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्त आणि बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करून शाबासकी दिली आहे.








