• सुदैवाने प्रवासी बचावले ; कार चालक जखमी
  • चिक्कोडी तालुक्यातील हत्तरवाट क्रॉसजवळ अपघात

चिक्कोडी : हत्तरवाट क्रॉसजवळ रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात कारने समोरून येणाऱ्या केएसआरटीसी परिवहन बसला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात कारचालक किरकोळ जखमी झाला असून बसमधील प्रवासी सुदैवाने बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, खड्डा टाळताना कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक बसली. धडकेच्या तीव्रतेमुळे कारचे मोठे नुकसान झाले.

घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ मदत करत जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले. बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. या प्रकरणी चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.