- सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दृश्य कैद
बेळगाव : शहरातील कुमारस्वामी लेआउट परिसरात चोरीच्या प्रयत्नाची घटना उघडकीस आली असून संशयास्पद हालचाल करणाऱ्या चौघा चोरट्यांचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी पहाटे सुमारे ३.३६ वाजण्याच्या सुमारास चार जणांची टोळी लेआउटमध्ये प्रवेश करताना दिसून आली. अत्यंत सावधपणे वावरणारे हे चोरटे काही घरांच्या आवारभिंतीमागे लपून परिसरातील घरांचे निरीक्षण करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते.
या दरम्यान काही घरांतील कुत्र्यांनी भुंकण्यास सुरुवात केल्याने संशय अधिक बळावला. त्यावरून ही टोळी चोरीच्या उद्देशानेच परिसरात फिरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ही बाब लक्षात येताच संबंधित घरमालकाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, या घटनेनंतर कुमारस्वामी लेआउटमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आपल्या भागात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.







