कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला. गावातील विठ्ठल-रखुमाई सभागृहात उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी यल्लाप्पा बेळगावकर होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उत्तम बाचीकर यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. खेळाडू घडविण्यात महत्त्वाचे योगदान देणारे हॉकी प्रशिक्षक सुधाकर चाळके आणि सैनिक प्रशिक्षक बाळासाहेब पसारे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी महिला कुस्तीपटू कल्याणी आंबोळकर हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिचा सन्मान करण्यात आला. गावातील उदयोन्मुख पैलवान रवळनाथ कणबरकर याने कोल्हापूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत ८२ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक पटकावला. सध्या तो हरियाणा येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे.

गावातील धावपटू प्रेम बुरुड हा मद्रास रेजिमेंट सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत असून, नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिक्स स्पर्धेत त्याने तृतीय क्रमांक मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले. तसेच खानापूर तालुक्यातील बैलूर येथील वैभव गावडे याची गोळाफेक स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड झाली आहे.

या सर्व खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेतर्फे त्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी बोलताना हॉकी प्रशिक्षक सुधाकर चाळके यांनी खेळाडूंचे मनोबल वाढवणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात. यासाठी महात्मा गांधी संस्था करीत असलेले कार्य अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

सैनिक प्रशिक्षक बाळासाहेब पसारे यांनी खेळाडूंना मोफत मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शवली. क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक, यल्लाप्पा बेळगावकर, के. आर. भास्कर, जोतिबा मोरे, चाळोबा सुतार, एम. पी. मोरे, सरस्वती आंबोळकर, भुजंग कणकुंबकर, केदारी कणबरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शिवाजी जाधव यांनी आभार मानले.