• सोशल वर्कर रेस्क्यू टीमची तत्परता
  • प्राथमिक उपचारांनंतर वनविभागाकडे सुपूर्द

बेळगाव : ग्रामीण बेळगावमधील चंदनहोसूर गावाजवळ भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाची सोशल वर्कर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी सुटका केली. जखमी हरणाला प्राथमिक उपचार दिल्यानंतर पुढील उपचार आणि पुनर्वसनासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.

शनिवारी सकाळी बेळगाव तालुक्यातील बसरीकट्टी गावाजवळ असलेल्या चंदनहोसूर परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका हरणावर हल्ला केला. या हल्ल्यात हरीण जखमी झाले. जखमी अवस्थेतील हरीण परिसरात आढळल्याची माहिती मिळताच बेळगावच्या सोशल वर्कर रेस्क्यू टीमचे सदस्य अवधूत तुडवेकर, शशिकांत आंबेवाडकर आणि राजू टक्केकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पथकाने हरणाला सुरक्षितपणे ताब्यात घेत त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसनासाठी हरणाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले. वन्यजीवाच्या बचावासाठी पथकाने दाखवलेल्या तत्परतेचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले.