- एसपी रामराजन यांचा इशारा
- दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पतंगप्रेमींना सुरक्षिततेचे आवाहन
बेळगाव : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्याचा उत्साह वाढत असताना धोकादायक मांजाचा वापर टाळावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी नागरिकांना केले आहे. मांजामुळे होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन विशेष लक्ष ठेवणार असून, विक्री करताना आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना रामराजन यांनी मांजामुळे होणाऱ्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली. गुरुवारी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका तरुणाच्या गळ्यात मांजा अडकून त्याचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद असल्याचे त्यांनी सांगितले. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मांजाच्या विक्री आणि वापरावर बंदी असतानाही काही ठिकाणी त्याची विक्री किंवा वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस यावर विशेष देखरेख ठेवणार आहेत. कोणताही व्यापारी मांजा विकताना आढळल्यास त्याच्याविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे रामराजन यांनी सांगितले.
पतंग उडविताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. व्यापाऱ्यांनी मांजाची विक्री करू नये, तसेच नागरिकांनीही तो खरेदी करू नये. सणाचा आनंद घेताना इतरांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि मांजामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यापूर्वी पोलीस आयुक्तांनीही मांजाविरोधात मोहीम सुरू केली होती. आता जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनीही या मोहिमेत सक्रिय भूमिका घेत मांजाच्या विक्री आणि वापराविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे.








