• ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याच्या उपक्रमाला बळ

कावळेवाडी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेला बेळगाव येथील नवसाहित्य पुस्तकालयाचे मालक शेषकुमार जवळकर यांनी ३०० पुस्तके भेट दिली आहेत. संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांच्याकडे ही पुस्तके सुपूर्द करून त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमाला हातभार लावला.

महात्मा गांधी सामाजिक संस्था गेल्या आठ वर्षांपासून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना वाचनासाठी मोफत पुस्तके उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी आवश्यक असलेली ३०० पुस्तके नवसाहित्य पुस्तकालयाकडून देण्यात आली आहेत. मराठी भाषा आणि वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या या उपक्रमाला जवळकर यांनी दिलेले सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

यावेळी शिवाजी शिंदे आणि अनुप वैद्य उपस्थित होते. मराठी भाषा संवर्धनाच्या कार्यात सहकार्य केल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. नामदेव मोरे, सचिव सतीश जाधव, कार्याध्यक्ष पी. आर. गावडे आणि सर्व संचालक मंडळाने समाधान व्यक्त केले.