- बेळगावच्या दोन युवकांचा जागीच मृत्यू
बेळगाव : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गोव्याला फिरण्यासाठी गेलेल्या बेळगावच्या दोन युवकांचा परतीच्या प्रवासात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. बेळगाव-चोर्ला मार्गावरील चोर्ला घाट परिसरात रविवारी सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास दुचाकी आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. निलेश बडाचे (वय २७, रा. नाथ पै नगर, अनगोळ) आणि साहिल कनकुले (वय २७, रा. बसवण्ण गल्ली, शहापूर) अशी मृतांची नावे आहेत.
दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी निलेश आणि साहिल हे दोघे गोव्याला गेले होते. तेथून दुचाकीवरून बेळगावकडे परतत असताना चोर्ला घाट परिसरात त्यांच्या दुचाकीची ट्रकशी जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता एवढी होती की, दोघेही दुचाकीवरून दूर फेकले गेले. गंभीर दुखापतींमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या युवकांचे मृतदेह आणण्यासाठी घटनास्थळी गेलेली रुग्णवाहिकाही अपघाताला बळी पडल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णवाहिका रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात गेल्याचे सांगण्यात येत आहे.
- एकाच दिवशी जांबोटी – चोर्ला मार्गावर तिघांचा मृत्यू
विशेष म्हणजे, रविवारी सकाळी खानापूर तालुक्यातील एका युवकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी चोर्ला घाटात आणखी दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे जांबोटी-चोर्ला मार्गावर एकाच दिवसात तीन तरुणांना जीव गमवावा लागला आहे. दिवाळीच्या आनंदासाठी घराबाहेर पडलेल्या युवकांवर काळाने घाला घातल्याने बेळगावसह खानापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.








