• दहा वर्षांच्या नात्याचा दुर्दैवी अंत
  • दुसऱ्या विवाहाला विरोध केल्याने कट रचून खून
  • मृतदेह तिलारी घाटातील जंगलात फेकला

बेळगाव : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीला सोडून दुसऱ्या तरुणीशी विवाह करण्याच्या तयारीत असलेल्या प्रियकराने तिची निर्घृण हत्या करून मृतदेह महाराष्ट्रातील जंगलात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेळगाव तालुक्यातील वंटमुरी येथील गंगव्वा हंचिनमणी (वय २५) हिचा तिचा लिव्ह-इन पार्टनर आणि खाजगी शिक्षक बसवराज करनावर (वय ३३, रा. राजनकट्टी, ता. हुक्केरी) याने त्याचे वडील आणि मामाच्या मदतीने खून केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दहा वर्षांपासून गंगव्वा आणि बसवराज हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान, बसवराजने दुसऱ्या तरुणीशी लग्न ठरवले होते. याला गंगव्वाने विरोध करत जाब विचारल्याने आरोपीने तिचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला.

‘विशालगडला फिरायला जाऊ’ असे सांगून बसवराजने गंगव्वाला कारमधून नेले. त्यानंतर वडील आणि मामाच्या मदतीने लोखंडी रॉडने तिच्यावर वार करून तिची हत्या करण्यात आली. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह महाराष्ट्रातील तिलारी घाटातील जंगलात फेकून दिला.

२९ मे रोजी तिलारी घाट परिसरात कुजलेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी चंदगड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत घटनास्थळ परिसरातील रस्ते आणि टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून संशयास्पद कारचा माग काढण्यात आला आणि शिक्षक बसवराज करनावरसह तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

दरम्यान, मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “मुलगी जेव्हा जेव्हा भेटायला यायची, तेव्हा सर्व काही ठीक असल्याचे सांगायची. पण तिची अशी हत्या होईल, असे कधीच वाटले नव्हते,” असे म्हणत गंगव्वाच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

मृत तरुणीचा भाऊ रमेश यानेही संताप व्यक्त करत, “महाराष्ट्र पोलीस घरी आल्यानंतरच बहिणीचा खून झाल्याचे समजले. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी मागणी केली आहे.