- मूलभूत सुविधांची सखोल पाहणी करा
- जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
बेळगाव : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सरकारी शाळा, अंगणवाड्या आणि वसतिगृहांना वेळोवेळी भेट देऊन तेथील मूलभूत सुविधांची सखोल पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हा पंचायत सभागृहात शाळा व अंगणवाडी केंद्रांच्या उद्घाटनासंदर्भात जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, अधिकारी जेव्हा त्यांच्या कार्यक्षेत्रातील वसतिगृहांना भेट देतात, तेव्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. वसतिगृहांमध्ये काही समस्या आढळल्यास त्या तत्काळ सोडवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
- शाळा सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना :
शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची नोंदणी वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात. कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना समजावून पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणावे, असे निर्देशही त्यांनी दिले. चालू शैक्षणिक वर्षातील सरकारी शाळा व महाविद्यालयांतील प्रवेश स्थितीची माहितीही त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.
शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालये आणि वसतिगृहांमध्ये स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीजपुरवठा तसेच इतर पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत का, याबाबतचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला.
अंगणवाड्यांमध्ये प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आणि शाळांमध्ये चौथ्या शनिवारी पालकसभा आयोजित करण्यात याव्यात. या बैठकींना तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनीही उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आले.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे नियोजन संचालक रवी बंगारप्पान्नावर, उपसचिव (विकास) बसवराज अडविमठ, नगरविकास निधी नियोजन संचालक मल्लिकार्जुन कलादगी, प्रधानमंत्री पोषण-शक्ती निर्माण योजनेचे जिल्हा शिक्षणाधिकारी लक्ष्मणराव यक्कुंडी तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







