कोल्हापूर : गेली सात दशके प्रलंबितअसलेल्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सीमावासियांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. वादग्रस्त मराठी भाषिक गावांचा महाराष्ट्रात समावेश व्हावा, या प्रमुख मागणीसाठी सीमावासियांच्या वतीने कोल्हापूर येथील ऐतिहासिक दसरा चौकात एकदिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या सीमावासियांनी महाराष्ट्र राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते, सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मागण्या प्रभावीपणे मांडण्यात राज्य सरकार कमी पडत असून, सरकारने आता या प्रश्नावर ठोस आणि निर्णायक भूमिका घेण्याची गरज आहे. क कर्नाटक सरकार ज्याप्रमाणे बेळगावमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन घेऊन आपली ताकद दाखवते, त्याचधर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही कोल्हापुरात अधिवेशन घेऊन सीमावासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली आहे. आज रोजी कोल्हापूरमधील ऐतिहासिक दसरा चौक येथे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांनी एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले.

गेली सात दशके प्रलंबित असलेला महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न तातडीने सोडवण्याच्या मागणीसाठी सीमावासीयांनी हे आक्रमक आंदोलन छेडले. सकाळी ११ वाजल्यापासून दसरा चौकात हे ठिय्या आंदोलन सुरू झाले. बेळगाव, निपाणी, खानापूर, कारवार, बिदर आणि भालकी येथील सीमावासीय व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. कोल्हापुरातील विविध सामाजिक संस्थांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलकांच्या हातात लाल रंगाचे लक्षवेधी फलक होते. त्यावर “महाराष्ट्रात घ्या नाहीतर जेलमध्ये टाका’, “आता नाही तर कधीच नाही” आणि “महाराष्ट्र शासन करतय काय ?” असा मजकूर लिहिला होता “बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.