• नागरिकांमध्ये संताप

खानापूर : येथील उपनिबंधक व विवाह नोंदणी कार्यालयात एजंटांचा वावर वाढल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कार्यालय प्रमुख रेणुका वक्कुंड वेळेवर उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत असून, या परिस्थितीचा काही एजंटांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे चित्र दिसत आहे.

कार्यालयातील शिस्त पूर्णपणे ढासळल्याची चर्चा सुरू आहे. अधिकारी वेळेत कार्यालयात हजर नसल्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांना उन्हात थांबावे लागत आहे. त्याचवेळी एजंट मात्र आधीच कार्यालय परिसरात उपस्थित राहून व्यवहार करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नोंदणीच्या कामासाठी दूरवरून येणाऱ्या नागरिकांना केवळ प्रतीक्षा करावी लागत असून, सरकारी सेवांपेक्षा एजंटांना अधिक प्राधान्य दिले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे कार्यालयातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या संपूर्ण प्रकाराकडे तहसीलदार आणि जिल्हा निबंधकांनी तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, तसेच कार्यालयात वेळेचे पालन सुनिश्चित करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.