- चोरीच्या ८ दुचाकी जप्त
बेळगाव : यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या अनेक घटनांमध्ये सहभागी असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरातील वाहनचोरीच्या टोळीला मोठा धक्का बसला आहे.
बेनकनहोळी गावचा रहिवासी संजू उर्फ संज्या मल्लाप्पा मेकली (वय २५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ११ एप्रिल रोजी नरसिंगपूर गावाजवळील भुयारी मार्गाजवळून गंगाप्पा कोडदावर यांची बजाज प्लॅटिना दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथक तयार केले होते.
१७ एप्रिल रोजी बेनकनहोळी परिसरात संशयास्पद हालचाली करत असताना संज्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने विविध ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. मौजमजा आणि चैनीच्या जीवनासाठी विविध जिल्ह्यांत तसेच शेजारील राज्यांमधून दुचाकी चोरल्याचेही त्याने मान्य केले.
त्याच्या माहितीच्या आधारे बजाज प्लॅटिना, हीरो स्प्लेंडर आणि होंडा ॲक्टिव्हा यांसह एकूण ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी, उपनिरीक्षक बी.के. पाटील, तसेच जी.बी. नागन्नवर, पी.के. किल्लेकर यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.








