• कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
  • पर्यायी मार्गाचा वापर करण्याची सूचना

खानापूर : खानापूर-जांबोटी रस्त्यावरील सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी ३० एप्रिल ते ५ मे या कालावधीत सहा दिवस या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला आहे.

या कालावधीत खानापूरहून येणारी वाहने पिरनवाडी, कुसमळी आणि जांबोटी या पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी या मार्गांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर रस्त्याचे रुंदीकरण आणि दुरुस्तीची कामे सुरू असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आवश्यक शोल्डर नसल्यामुळे वाहतूक सुरू असताना कामात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी सहा दिवस वाहतूक बंद ठेवण्याची विनंती राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

त्यावर निर्णय घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कालावधीत वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख आणि पोलीस आयुक्तांना चेकपोस्ट उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.