- भंडाऱ्याच्या उधळणीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
कंग्राळी (बु.) : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावात तब्बल ४३ वर्षांनंतर भरलेल्या ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त आज भव्य रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. भंडाऱ्याची उधळण, जयघोष आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीने गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला मंगळवारपासून उत्साहात सुरुवात झाली. अक्षतारोपणाच्या विधीनंतर बुधवारी सकाळी देवीच्या भव्य रथोत्सवास प्रारंभ झाला. श्री गणेश व श्री कलमेश्वर मंदिरातून रथाची मिरवणूक निघाली असून सायंकाळपर्यंत संपूर्ण गावातून रथ फिरवण्यात येणार आहे.

“श्री महालक्ष्मी देवीचा जयघोष” करत आणि भंडाऱ्याची उधळण करत हजारो भक्तांनी रथ ओढला. यावेळी भाविकांनी रथावर खारीक, खोबरे व केळी उधळून पारंपरिक पद्धतीने सहभाग नोंदविला.
गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामस्थांकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली होती. तब्बल ४३ वर्षांनंतर पुन्हा हा सोहळा अनुभवण्याचा योग आल्याने ग्रामस्थांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सुख-शांती व समृद्धीची प्रार्थना केली.

यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ, पंच कमिटी व ग्रामपंचायतीचे मोलाचे सहकार्य लाभले. स्थानिक आमदार तथा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचेही सहकार्य मिळाल्याची माहिती यल्लोजी पाटील यांनी दिली. पुढील नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आजच्या रथोत्सवानंतर देवीची मूर्ती गदगेवर विराजमान होणार असून पुढील सात दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांतून यात्रा साजरी होणार आहे.








