• जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची सूचना

बेळगाव : जिल्ह्यातील कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने आणि समन्वयाने कारवाई करावी. ज्या गावांमध्ये पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्याठिकाणी दररोज किंवा एक दिवसा आड टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे बंधनकारक आहे. तसेच नागरिकांमध्ये पाण्याचा योग्य वापर व बचत याबाबत जनजागृती करावी अशी सूचना जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी दिली आहे.

मंगळवारी जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी उपस्थित होते. पिण्याचे पाणी तसेच जनावरांसाठी चारा व पाणीपुरवठा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिंदे म्हणाले, मे महिन्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रत्येक गावात किमान तीन खाजगी कुपनलिकांची ओळख करून ठेवावी. आवश्यकतेनुसार संबंधित मालकांची संपर्क साधून तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. जनावरांना चारा आणि पाण्याची कमतरता भासू नये यासाठी आगाऊ उपाययोजना कराव्यात. गावांमध्ये जनावरांसाठी पाण्याची टाकी किंवा कुंड बांधण्यावर भर द्यावा असे निर्देशही त्यांनी दिले.