- महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांचे निर्देश
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त कार्तिक एम यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना, सरकारने दिलेल्या आदेशानुसार जनगणनेचे महत्त्वाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
सोमवारी (२७ एप्रिल) महापालिकेत आयोजित जनगणना कामाच्या प्रगतीचा आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी बोलताना ते म्हणाले, विविध स्तरांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतत संपर्क आणि समन्वयाने गणकांच्या कामावर लक्ष ठेवावे.
कामात दिरंगाई होणाऱ्या भागांची समस्या सोडवून काम तत्परतेने पूर्ण केले पाहिजे. माझ्यासह संबंधित अधिकाऱ्यांना दररोज संध्याकाळी अहवाल सादर करणे बंधनकारक आहे आणि कर्मचाऱ्यांनी कोणतीही सबब न सांगता त्यांना सोपवलेली कामे त्वरित पूर्ण करावीत. कामात निष्काळजीपणा अथवा विलंब झाल्यास कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.
निर्धारित वेळेत जनगणनेचे काम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले आणि अशा कर्मचाऱ्यांना अभिनंदन पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी तातडीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत, महापालिकेचे उपायुक्त (महसूल), शहर जनगणना अधिकारी डॉ. सिद्दू हुल्लोली आणि प्रशासकीय विभागाचे उपायुक्त उदयकुमार बी. टी., तसेच जनगणनेचे सर्व प्रभारी अधिकाऱ्यांनी कामाच्या प्रगतीविषयी माहिती दिली. या बैठकीत जनगणना विभागाचे सर्व प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.








