• श्री चामुंडेश्वरी देवी दर्शन घेण्याचाही आदेश

बेंगळुरू : ‘कांतारा’ चित्रपटातील एका वादग्रस्त विधानप्रकरणी अभिनेते रणवीर सिंह यांनी केलेली विनाअट क्षमायाचना कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. यासोबतच न्यायालयाने त्यांना पुढील चार आठवड्यांत म्हैसूर येथील चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचे निर्देश दिले आहेत.

गोव्यात पार पडलेल्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कांतारा : चॅप्टर १’ संदर्भातील कार्यक्रमात रणवीर सिंह यांनी चित्रपटातील ‘दैवा’ या पात्राची नक्कल करताना वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यांनी ‘दैवा’चा उल्लेख ‘स्त्री भूत’ असा केल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत कर्नाटकात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी दिलासा मिळावा म्हणून रणवीर सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २५ एप्रिल रोजी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी विनाअट माफी मागितली. तक्रारदार प्रशांत मेथा यांनीही न्यायालयासमोर रणवीर सिंह यांनी मनापासून क्षमा मागितल्याचे सांगत प्रकरण निकाली काढण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले.