बेळगाव : टिळकवाडीतील पहिल्या रेल्वे गेटजवळ उभारण्यात आलेल्या बॅरिकेट्समुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत बॅरिकेट हटाव संघटनेने राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
गृहमंत्री बेळगाव दौऱ्यावर असताना संघटनेचे अध्यक्ष सुभाष घोलप यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी संबंधित ठिकाणचे बॅरिकेट्स तातडीने हटवावेत, तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दोन पोलिसांची नियुक्ती करावी आणि खासगी संकुलासमोरील अडथळे दूर करावेत, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, या बॅरिकेट्समुळे पादचारी, विद्यार्थी तसेच वाहनधारकांना मोठा वळसा घालावा लागत आहे. परिणामी चुकीच्या यू-टर्नमुळे अनेक अपघात घडल्याचेही संघटनेने निदर्शनास आणले. याशिवाय, या अडथळ्यांमुळे स्थानिक व्यापारावर परिणाम होत असून व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही सांगण्यात आले.
दुसऱ्या रेल्वे गेटप्रमाणे येथेही प्रभावी पोलीस बंदोबस्त ठेवून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, तसेच गतिरोधक बसवावेत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
या समस्येवर लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिले. यावेळी अनंत पाटील, अमित जोशी यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.







