• वीस जण जखमी

मध्यप्रदेश : धार जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात पिक-अप वाहन उलटल्याने १२ मजूरांचा मृत्यू झाला असून सुमारे २० जण जखमी झाले आहेत. चिकलिया येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे साडेआठ वाजता मजुरांना घेऊन जाणारी पिक-अप गाडी अनियंत्रित होऊन उलटली. वाहनात क्षमतेपेक्षा अधिक, सुमारे ३० हून अधिक मजूर प्रवास करत होते. गाडी उलटल्यानंतर अनेक जण तिच्या खाली दबले गेले, तर काहींचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी इंदौर येथे हलवण्यात आले आहे.

धार जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी अभिषेक चौधरी यांनी १२ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली असून, जखमींवर उपचार सुरू असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.