- शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे कालिदास दिन साजरा
बेळगाव : “कविता सृजनाची प्रक्रिया अत्यंत गूढ आहे. कविता म्हणजे एका हृदयाचा दुसऱ्या हृदयाशी साधलेला संवेदनशील संवाद होय. संत तुकाराम, कबीर यांच्यापासून ते आजच्या समकालीन कवींंपर्यंत समाजप्रबोधनासाठी प्रभावी माध्यम म्हणून कवितेचा उपयोग होत आला आहे. एखादी भावना कवीला अंतर्मुख करते, अस्वस्थ करते आणि तीच भावना शब्दरूप धारण करून कवितेच्या रूपाने जन्माला येते. कवी जसा सौंदर्याच्या विविध छटा रेखाटतो, तसाच तोन समाजातील वास्तवाचेही प्रामाणिक चित्रण करतो. कवीने सतत जागृत राहून समाजात, निसर्गात आणि आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांकडे कलात्मक, संवेदनशील आणि चिकित्सक नजरेने पाहिले पाहिजे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी, समीक्षक व व्याख्याते डॉ. उमेश कळेकर यांनी केले.
येथील शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कवी कालिदास दिनानिमित्त आयोजित “कवितेचे वर्म, मर्म आणि धर्म” या विशेष व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम शाहिद भगतसिंग सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी होते. व्यासपीठावर संघाचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर आणि सचिव सुधाकर गावडे उपस्थित होते.
प्रारंभी कवी परशराम खेमाणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट करणारे प्रास्ताविक केले. यानंतर उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर यांच्या हस्ते डॉ. उमेश कळेकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या व्याख्यानात डॉ. कळेकर यांनी कविता लेखनाची प्रक्रिया, कवीची संवेदनशीलता, अनुभवांचे कलात्मक रूपांतर आणि कवितेतील अभिव्यक्तीचे महत्त्व यांचा सखोल उहापोह केला. त्यांनी स्वतःच्या काही निवडक कवितांचे सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. “कवितेचा गाव” या कवितेतून कवीचे कवितेशी असलेले भावबंध त्यांनी प्रभावीपणे व्यक्त केले. “पाऊस” ही कविता आपल्या दमदार शैलीत सादर करताच सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. तर “इलेक्शन” या कवितेद्वारे देशातील राजकीय वास्तवावर त्यांनी मार्मिक भाष्य केले.
कवीने सतत जागृत राहून समाजात, निसर्गात आणि आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांकडे कलात्मक, संवेदनशील आणि चिकित्सक नजरेने पाहिले पाहिजे. सामाजिक वास्तव, मानवी मूल्ये आणि जीवनातील सूक्ष्म अनुभव यांचे काव्यरूपांतर करण्याची क्षमता कवीने विकसित केली पाहिजे, असे सांगत त्यांनी कवितेचे वर्म, मर्म आणि धर्म यांचा परिपूर्ण उलगडा केला.
अध्यक्षीय समारोपात प्रा. अशोक आलगोंडी यांनी बेळगावच्या समृद्ध मराठी साहित्यपरंपरेचा आढावा घेत शब्दगंध कवी मंडळ संघ गेली अनेक दशके मराठी भाषा, साहित्य आणि काव्यसंस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि साहित्यिक उपक्रमांद्वारे मराठी साहित्याचा वारसा पुढे नेणे, ही संघाची बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. शिवाजीदादा कागणीकर, प्रकाश मरगाळे, शिवराज पाटील, प्रा. स्वरूपा इनामदार, रेखा गद्रे, गुरुनाथ किरमटे, चंद्रशेखर गायकवाड, स्मिता किल्लेकर, अस्मिता अळतेकर, नेहा जोशी, मंदाकिनी देसाई, सागर मरगाणाचे यांच्यासह अनेक कवी, साहित्यप्रेमी आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कनबरकर यांनी केले, तर जितेंद्र रेडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.








