• १७० विद्यार्थ्यांची दंत, हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी ; आरोग्य जनजागृतीला चालना

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने शिवबसवनगर येथील श्री सिद्धरामेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी आणि रक्तगट निश्चिती शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात १७० विद्यार्थ्यांची विविध आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबच्या अध्यक्षा रोटे. डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षा रोटे. उर्मिला गणी यांच्या नियोजन व समन्वयाचे कौतुक केले. तसेच सचिव रोटे. ज्योती कुलकर्णी यांनी केलेल्या प्रभावी व्यवस्थापनाबद्दलही त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या उपक्रमात रोटे. डॉ. स्मिता गुडगणट्टी, रोटे. राजनंदा गार्गी, रोटे. सुरेखा मुम्मिगट्टी आणि रोटे. लक्ष्मी चव्हाण यांनी सक्रिय सहभाग घेत शिबिराच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.

शिबिरासाठी कमाख्या डायग्नॉस्टिक्सच्या रोटे. आशा पाटील यांनी तपासणी सेवांचे प्रायोजकत्व स्वीकारले, तर मराठा मंडळ दंत महाविद्यालयाच्या डॉ. रम्या यांनी विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करून आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्य सेवेसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल कमाख्या डायग्नॉस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील आणि डॉ. रम्या यांचा रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. “स्वतःपेक्षा सेवा श्रेष्ठ” या रोटरीच्या ब्रीदवाक्यानुसार आरोग्य, शिक्षण आणि समाजकल्याणासाठी अशा लोकहितकारी उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.