• सासरकडून छळ झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
  • बेळगाव ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू

बेळगाव : बेळगाव शहरात २८ वर्षीय विवाहित महिलेने आपल्या लहान मुलासह आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालय (बिम्स) परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सासरच्या छळाला कंटाळूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेमा तळवार (२८) आणि तिच्या मुलाने आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी बिम्स रुग्णालयात धाव घेतली. यावेळी संतप्त नातेवाईकांनी तिच्या सासूला जाब विचारण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.

मृत महिलेची आई फकीरव्वा पावडी यांनी आरोप केला की, सासरच्या मंडळींनी प्रेमाच्या नावावर विविध बँका आणि वित्तीय संस्थांतून अनेक कर्जे घेतली होती. त्यानंतर आणखी १० लाख रुपये आणण्यासाठी तिच्यावर सातत्याने शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. तिचे दागिने काढून घेणे, उपाशी ठेवणे अशा प्रकारेही तिचा छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

मृत महिलेचा भाऊ नागेश याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी घरात कोणी नसताना ही घटना घडली. जुन्या कर्जाच्या ओझ्याबरोबरच तम्मण्णी नावाचा एक व्यक्ती पैशांसाठी वारंवार घरी येऊन धमकावत असल्याने प्रेमा मानसिक तणावाखाली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा आरोप त्याने केला.

या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांसह सर्व बाबींचा पोलीस सखोल तपास करत आहेत.