- १३ व्या क्रमांकाने निवड ; बार कौन्सिलवर बेळगावचे प्रतिनिधित्व मजबूत
बेळगाव : कर्नाटक राज्य बार कौन्सिलच्या निवडणुकीत बेळगावचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आय. एम. पाटील यांनी उल्लेखनीय यश संपादन करत विजय मिळवला आहे. या विजयामुळे राज्याच्या विधी क्षेत्रात बेळगावचे प्रतिनिधित्व अधिक बळकट झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
निवडणुकीच्या अंतिम निकालात ॲड. आय. एम. पाटील यांनी १३ वे स्थान मिळवत बार कौन्सिलवरील आपले स्थान निश्चित केले. बेळगाव वकील संघटनेच्या प्रमुख उमेदवारांपैकी एक असलेल्या पाटील यांच्या विजयाचे जिल्हाभरातील विधिज्ञांकडून स्वागत करण्यात आले.
या यशानंतर बेळगाव बार असोसिएशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. निकालाबाबत प्रतिक्रिया देताना संघटनेचे अध्यक्ष एस. एस. कीवडसन्नवर यांनी सांगितले की, ॲड. पाटील यांच्या निवडीमुळे बेळगाव वकील संघटनेचा सन्मान वाढला असून जिल्ह्यातील सर्व तालुका वकील संघटनांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
दरम्यान, ॲड. पाटील यांचे बंधू लिंगनगौडा पाटील यांनीही आनंद व्यक्त करत, राज्य बार कौन्सिलमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व मिळणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब असल्याचे सांगितले.
या निवडीमुळे वकील बांधवांच्या विविध प्रश्नांना राज्य पातळीवर अधिक प्रभावीपणे मांडता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून बेळगावच्या विधिज्ञ क्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.







