• निवासस्थानी चार्टर्ड अकाउंटंटसोबत दीर्घ चर्चा

बेळगाव : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीनंतर उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ बेळगावात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. छापेमारीनंतरच्या घडामोडींमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावातील टीव्ही सेंटर परिसरातील निवासस्थानी पोहोचल्यानंतर वाय. मंजुनाथ यांनी आर्थिक आणि कायदेशीर बाबींवरील मार्गदर्शनासाठी शहरातील ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट सीए पी. जी. गाली यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे तीन तास चालल्याचे सांगितले जाते.

या चर्चेदरम्यान ईडीकडून तपासण्यात आलेले आर्थिक व्यवहार, जप्त करण्यात आलेली कागदपत्रे, संभाव्य नोटिसा तसेच पुढील चौकशीच्या प्रक्रियेला सामोरे जाण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर विचारविनिमय झाल्याची चर्चा आहे. भविष्यात उद्भवू शकणाऱ्या कायदेशीर बाबींविषयीही मार्गदर्शन घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दीर्घ चर्चेनंतर सीए पी. जी. गाली यांनी निवासस्थानातून प्रस्थान केले. ईडीच्या धाडीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे वाय. मंजुनाथ यांच्या पुढील भूमिकेकडे आणि तपासातील आगामी घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.