- १५ दिवसांत समस्या न सुटल्यास काळे झेंडे दाखवण्याचा इशारा
- संतप्त नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : तालुक्यातील मुतगा गावातील विविध वसाहतींमधील मूलभूत सुविधांच्या समस्यांबाबत नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन आणि कचरा विल्हेवाटीचे प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप करत, १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
श्रीराम कॉलनी, साईनगर, गोकुळनगर आणि विनायक नगर परिसरातील नागरिकांनी बुधवारी एकत्र येत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या भागांतील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, प्रभावी गटार व्यवस्थेअभावी पावसाळ्यात सांडपाणी रस्त्यावर आणि घरांसमोर साचत असल्याने आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. कचरा संकलन आणि विल्हेवाटीची व्यवस्था नियमित नसल्याने काही भागांत कचऱ्याचे ढिग साचत असून दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या वाढत असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या प्रश्नांबाबत ग्रामपंचायत आणि संबंधित विभागांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला; मात्र अपेक्षित सुधारणा झालेली नाही. कर भरूनही मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
निवेदनाद्वारे प्रशासनाने विशेष निधी उपलब्ध करून रस्त्यांची दुरुस्ती, गटार व्यवस्थेची उभारणी आणि नियमित कचरा व्यवस्थापनासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा पुढील १५ दिवसांत प्रश्न न सुटल्यास जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांविरोधात काळे झेंडे दाखवून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवी कोटबागी, आकाश शेट्टी, शिवू पाटील, विनोद कुलकर्णी, मडिवळप्पा कलबावी, शांतीनाथ बलीगार, सी. बी. यारगंबळीमठ, धनपाल ओकळी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.








