- नूतनीकरणाची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
बेळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या नूतनीकरण आणि विविध विकासकामांची पाहणी केली. कार्यालय परिसराचे सुशोभीकरण आणि नागरिकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असून, सर्व कामे दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज मोठ्या संख्येने नागरिक विविध कामांसाठी येत असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी परिसराचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याअंतर्गत अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, सुस्थितीत रस्त्यांची उभारणी तसेच वाहनतळाची सुविधा वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नकाशाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती मंत्र्यांना दिली. कार्यालय परिसरात प्रशस्त पार्किंगची व्यवस्था उभारण्यात येत असून, त्यामुळे नागरिक आणि अधिकारी यांना वाहन उभे करण्याची सुविधा अधिक सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाहणीदरम्यान मंत्री जारकीहोळी यांनी कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, तसेच सर्व विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियमितपणे कामांचा आढावा घ्यावा, असे निर्देश दिले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.







