• कामधेनू अय्यप्पा सेवा संघाकडून निवेदन ; कारवाईविरोधात नाराजी

बेळगाव : मध्य प्रदेशात गो रक्षकांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कामधेनू अय्यप्पा सेवा संघाच्या वतीने सोमवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनामार्फत सरकारला निवेदन सादर करून संबंधित गो रक्षकांची तातडीने सुटका करण्याची मागणी केली.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, मध्य प्रदेशात सुमारे पंधरा दिवसांपूर्वी १४ गो रक्षकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईचा निषेध नोंदवित कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपली भूमिका मांडली. गो संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना वारंवार लक्ष्य केले जात असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढत असल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

ताब्यात घेण्यात आलेल्या १४ गो रक्षकांना कायदेशीर प्रक्रियेनुसार जामीन मंजूर करून त्यांची लवकरात लवकर मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी काळात बेळगाव जिल्ह्यात व्यापक आंदोलन उभारण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

या आंदोलनात प्रमुख गो रक्षक नीलेश, प्रकाश लाडवा, आनंद नवले, नागराज कमलापूर, किरण, महेश आणि हितेश यांच्यासह कामधेनू अय्यप्पा सेवा संघाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.