- पुनर्बांधणीसाठी तातडीच्या सूचना
बेळगाव : कपिलेश्वर मंदिराच्या मागील तलावात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर प्रशासन हलले असून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
रविवार दि. ३ मे रोजी घडलेल्या घटनेत पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा कठडा कोसळून मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून या जीर्ण अवस्थेतील तलावासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सदर जागा गोडसे कुटुंबियांच्या मालकीची होती, मात्र त्यांनी ती बेळगाव महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्याचा दावा केला आहे. २०१६ आणि २०२२ मध्ये ही प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्ष हस्तांतरण का रखडले, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
या संदर्भात गोडसे कुटुंबीय, युवा समिती सीमाभाग व नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने महापालिकेच्या अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर यांच्याशी संपर्क साधून हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तलावाची पुनर्बांधणी व दुरुस्तीचा आराखडा ७ मेपर्यंत सादर करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच या कामासाठी राज्य आपत्कालीन निधीतून आर्थिक तरतूद करण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत. लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसोबत तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला गोडसे कुटुंबीयांचे व्यंकटेश गोडसे, श्रीकांत गोडसे, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले तसेच युवा समिती सीमाभागचे पदाधिकारी उपस्थित होते.








