कंग्राळी (बु.) : बेळगाव तालुक्याच्या कंग्राळी (बु.) गावातील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला आज भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर पार पडलेल्या अक्षतारोपण सोहळ्याने यात्रेची सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली.

यात्रेनिमित्त पहाटेपासूनच गावात उत्साहाचे वातावरण होते. पहाटे ५.४८ वा. पुजारी, मंदिर ट्रस्ट आणि पंच समितीच्या उपस्थितीत देवीचा अक्षतारोपण सोहळा पार पडला. या मंगल प्रसंगी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार तसेच महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून देवीची पूजा केली.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, सर्व धार्मिक कार्यक्रम शांततेत आणि सलोख्याने पार पडावेत, असे आवाहन केले. तसेच उद्या होणारा रथोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यास सांगून देवीची कृपा सर्वांवर राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली. त्याचप्रमाणे, युवक काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, उद्या सकाळी ९ ते सायंकाळपर्यंत रथोत्सव पार पडणार असून देवी सिंहासनावर विराजमान होणार आहे. तसेच रात्री हल्याळ येथील वारकऱ्यांकडून जागरण, अंध मुलांसाठी विशेष कार्यक्रम आणि इचलकरंजी येथील महाराजांचे कीर्तन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते.









