• आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याच्या शक्यतांची चाचपणी

बेळगाव : बुडा अध्यक्ष आणि बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी कणबर्गी येथील प्रस्तावित आयटी पार्कलगतच्या ११० एकर जमिनीची पाहणी केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी या जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याच्या शक्यतांवर त्यांनी चर्चा केली.

आमदार आसिफ सेठ यांनी बुडा अधिकारी आणि युवा नेते अमन सेठ यांच्यासह कणबर्गी परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी जमिनीची सद्यस्थिती, तिची उपयुक्तता आणि भविष्यातील विकासाच्या शक्यतांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांना चांगली घरे उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे आसिफ सेठ यांनी सांगितले. बुडा अध्यक्ष म्हणून शहराच्या विकासाचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पाच्या दृष्टीने जमिनीची उपयुक्तता, विकासाच्या शक्यता तसेच आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियांचा सर्वंकष आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या पाहणीमुळे कणबर्गी परिसरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याच्या शक्यतांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.