- केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा नोंदवला निषेध
बेळगाव : जागतिक कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये केंद्र व राज्य सरकारांच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात सीआयटीयूच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी होत हजारो कामगारांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला.
राणी चन्नम्मा सर्कलपासून कन्नड साहित्य भवनपर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात आंदोलकांनी केंद्र सरकारच्या कामगार कायद्यातील बदलांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. कामगार कायद्यांचे चार कोडमध्ये रूपांतर करून कामगारांचे हक्क कमी करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे महागाईत मोठी वाढ झाली असून कामगार वर्गाची क्रयशक्ती घटली आहे. “समान कामासाठी समान वेतन दिले जात नाही. गेल्या अनेक वर्षांत कामगारांच्या हिताचा ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. कायद्यातील बदल कामगारांसाठी अन्यायकारक ठरत आहेत,” असे मत सीआयटीयूच्या अध्यक्षा मंदा नेवगी यांनी व्यक्त केले.
या आंदोलनाद्वारे कामगार कायद्यातील दुरुस्त्या रद्द कराव्यात आणि कामगारांच्या हितासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात सीआयटीयूचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








