• येळ्ळूर म. ए. समितीचे आवाहन

बेळगाव : सीमाभागातील मराठी जनतेवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ रविवार, १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनानिमित्त आयोजित सायकल फेरीत येळ्ळूरमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे. काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर येथे आयोजित जनजागृती फेरीदरम्यान हे आवाहन करण्यात आले. सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि मराठी भाषेप्रती असलेली अस्मिता व एकजूट दाखवून देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी समितीचे सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर यांनी सीमालढ्यात येळ्ळूर गावाने दिलेल्या योगदानाची माहिती दिली. सीमालढ्याचा गौरवशाली इतिहास तरुण पिढीने जाणून घ्यावा आणि मराठी अस्मितेची मशाल पुढे घेऊन जावी, असे आवाहन त्यांनी केले.

  • मराठी अस्मितेचा भगवा फडकवत ठेवण्याचा निर्धार :

आगामी तालुका पंचायत, जिल्हा पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे. मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी भगव्या झेंड्याखाली एकजुटीने उभे राहून निवडणुकांमध्ये प्रचंड मताधिक्याने विजय मिळवावा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला अभेद्य ठेवावा, असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी आणि अध्यक्ष वामन पाटील यांनी केले.

सुगीचे दिवस असूनही मराठी अस्मितेच्या भावनेतून जनजागृती फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले. सीमाप्रश्नाच्या लढ्यात प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय योगदान देत मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी एकजुटीने संघर्ष सुरू ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या जनजागृती फेरीत सतीश देसूरकर, प्रकाश मालुचे, श्रीकांत नांदुरकर, प्रवीण कंग्राळकर, पुंडलिक कंग्राळकर, नारायण मरवे, पप्पू कंग्राळकर, लक्ष्मण कुंडेकर, यल्लाप्पा हुव्वान्नावर, गणेश अष्टेकर, रामा पाखरे, नंदकुमार पाटील, कृष्णा शहापूरकर, दत्ता उघाडे, नेताजी गोरल, प्रकाश पाटील, नागेश बोबाटे, दयानंद उघाडे, राकेश परीट, बाळू कंग्राळकर, पंकज धामणेकर, अशोक धामणेकर, संदीप कंग्राळकर, काशिनाथ मरवे, सुमीत चतुर, सोमनाथ बाटले, रमेश गोरल, प्रवीण वालेकर, सागर हंपण्णावर, मारुती धामणेकर, सुनील कांबळे, आनंद गोरल, कार्तिक कोकणे, सौरभ गणाचारी, योगेश सायनेकर, राहुल कुगजी, रोहित धामणेकर, सूरज पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी राजू पावले यांनी आभार मानले.