- आरक्षण प्रक्रिया अंतिम टप्प्यात ; प्राथमिक अधिसूचना गुरुवारी
बेंगळुरू : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. दोन्ही संस्थांच्या मतदारसंघांची पुनर्रचना आणि आरक्षण निश्चितीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, यासंदर्भातील प्राथमिक अधिसूचना गुरुवारी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ईश्वर खंडे यांनी दिली.
- प्राथमिक अधिसूचनेनंतर हरकतींना संधी
प्राथमिक आरक्षण यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिक, राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांना हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. प्राप्त हरकतींची छाननी करून निर्णय घेतल्यानंतर अंतिम आरक्षण यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.
- अनेक वर्षांपासून प्रशासकांच्या हाती कारभार
निवडणुका न झाल्याने गेल्या काही वर्षांपासून अनेक जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतींचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सुरू आहे. निवडणुका झाल्यानंतर या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा लोकप्रतिनिधींचे नेतृत्व येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
- जानेवारीत निवडणुकांबाबत विचार
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा झाली. जानेवारीच्या सुरुवातीला जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुका घेण्याबाबत विचार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका घेण्याचा सरकारचा प्राथमिक विचार असल्याचे सांगण्यात येत आहे.
- ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग
आरक्षणाची प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांकडून मतदारसंघनिहाय तयारी, तर राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जि. पं. आणि ता. पं. निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








