- मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या
- दगडाने ठेचून, गळा आवळून घेतला जीव
- हुक्केरी तालुक्यातील धक्कादायक घटना
बेळगाव : जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात मालमत्ता विक्रीच्या वादातून सख्ख्या मोठ्या भावाने लहान भावाची दगडाने ठेचून आणि गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोठ्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मृताचे नाव राजू सिद्धप्पा रुद्रप्पगोळ (वय ४५) असे असून, त्याचा मोठा भाऊ संजू रुद्रप्पगोळ (वय ४९) हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडगेरी गावातील तीन एकर जमीन विक्रीच्या कारणावरून दोन्ही भावांमध्ये वाद सुरू होता. या वादाचे पर्यवसान तीव्र भांडणात झाले. संतापाच्या भरात आरोपी संजूने लहान भाऊ राजूच्या डोक्यात दगडाने जोरदार प्रहार केला. त्यानंतर गळा आवळून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे.
हे दोन्ही भाऊ मूळचे हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी गावचे असले तरी गोकाक तालुक्यातील अंकलगी गावातील एका पडक्या इमारतीत वास्तव्यास होते. मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करत होते. दररोज रात्री अंकलगी मठात जेवण करून ते मुक्कामासाठी त्या इमारतीत परतत असत.
या घटनेप्रकरणी सुरुवातीला दोन्ही कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मात्र, पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू करून पुढील कायदेशीर कारवाई हाती घेतली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.








