- आश्वासनाच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्याची महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी
बेळगाव : मराठी परिपत्रके आणि मराठी फलकांच्या अंमलबजावणीसंदर्भात यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार आतापर्यंत कोणती कार्यवाही करण्यात आली, याची माहिती द्यावी, या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मंगळवारी जिल्हाधिकारी रोशन यांना पुन्हा निवेदन सादर केले.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. २२ जून २०२६ रोजी समितीने काढलेल्या मोर्चानंतर मराठी परिपत्रके आणि फलकांबाबत समिती स्थापन करून निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. त्या अनुषंगाने आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
समितीने प्रशासनाला दिलेली दहा दिवसांची मुदत संपल्यानंतर शिष्टमंडळाने पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आश्वासनाची पूर्तता करण्याची आठवण करून दिली. मराठी परिपत्रके व फलकांची मागणी तातडीने अमलात आणावी, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.
निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी रोशन यांनी उपमुख्यमंत्री यांच्या आगामी बेळगाव दौऱ्याच्या तयारीमुळे सध्या प्रशासकीय व्यस्तता असल्याचे सांगितले. दौरा पूर्ण झाल्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावून या विषयावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्यासमवेत माजी आमदार मनोहर किणेकर, एम. जी. पाटील आणि प्रकाश गडकरी उपस्थित होते.








