- बेळगावच्या रेस्क्यू पथकाच्या अथक प्रयत्नांना यश
खानापूर : गोव्यातील सत्तरी तालुक्यातील सुरल (सुर्ल) धबधब्यात बुडालेल्या बेळगावच्या २० वर्षीय तरुणाचा मृतदेह सोमवारी अखेर शोधून बाहेर काढण्यात आला. मुसळधार पाऊस, वेगवान पाण्याचा प्रवाह आणि दुर्गम परिसरामुळे बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र बेळगावच्या रेस्क्यू पथकाने स्थानिक यंत्रणांच्या मदतीने राबविलेल्या अथक शोधमोहीमेला अखेर यश मिळाले.
मृत तरुणाची ओळख आदित्य दीपककुमार सत्पती (वय २०) अशी झाली आहे. तो मित्रांसमवेत सहलीसाठी सुरल धबधब्यावर गेला होता. म्हादई अभयारण्य परिसरातील धबधब्यात पाण्यात उतरल्यावर खोली आणि पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलीस, म्हादई अभयारण्याचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रविवारी सायंकाळपर्यंत शोधमोहीम सुरू होती. मात्र मुसळधार पाऊस, वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे रात्री शोधकार्य स्थगित करण्यात आले.
सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते आणि रेस्क्यू पथकातील अवधूत तुडवेकर, पदमप्रसाद हुली, विक्की मेहता, शुभम हुली, मायकल पिंटो, रोशन तनावडे आणि आकाश यांनी स्थानिक यंत्रणांच्या सहकार्याने अथक प्रयत्न करत अखेर आदित्यचा मृतदेह बाहेर काढला. अनेक तास पाण्यात राहिल्यामुळे तसेच माशांमुळे मृतदेहाचा चेहरा विद्रूप झाल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे बेळगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आदित्य हा मूळचा ओडिशा राज्यातील रहिवासी असून त्याचे कुटुंब सध्या बेळगावात वास्तव्यास आहे. त्याचे वडील दीपककुमार सत्पती हे भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी आहेत. आदित्यच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्रपरिवारातही शोककळा पसरली आहे.







