• अवघ्या ४८ तासांत आरोपीला नेसरगी पोलिसांकडून अटक

बेळगाव : जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील वण्णूर गावात मुलगा झाल्याच्या आनंदात पार्टी मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील फरार आरोपीला नेसरगी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून २०२६ रोजी वण्णूर गावातील हनुमंतप्पा यमनप्पा इतापी याने त्याचा मित्र विश्वनाथ सिद्धय्या पूजेरी (वय २९) याच्याकडे मुलगा झाल्याच्या आनंदात पार्टीची मागणी केली होती. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संतापलेल्या विश्वनाथने हनुमंतप्पाच्या डोक्यावर दगडाने वार केला. या हल्ल्यात हनुमंतप्पाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

या घटनेप्रकरणी मृताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेसरगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, अप्पर पोलीस अधीक्षक रामुगोंडा बसरगी आणि बैलहोंगलचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली नेसरगीचे पोलीस निरीक्षक गजानन नाईक यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.

तपास पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे २८ जून २०२६ रोजी आरोपी विश्वनाथ पूजेरी याला अटक केली. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, अवघ्या ४८ तासांत आरोपीला जेरबंद करणाऱ्या पोलीस पथकाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले आहे.